24 ऑक्टोबरला 'आरोग्य'ची पदभरती परीक्षा


नाशिक

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यापूर्वी दोनदा रद्द झालेल्या आरोग्य सेवा अंतर्गत गट 'क' व 'ड' पदभरती परीक्षा अखेर येत्या २४ ऑक्टोबरला होणार आहे. परिक्षेसंदसंदर्भातील त्रुटी दूर करण्यात यश आल्याचे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी येथे सांगितले.

डॉ. पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेउन आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत उपस्थित होत असलेल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतानाच आरोग्य विभागाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, कोविड साथीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या परवानगीनंतर आरोग्य विभागाने गट क मधील ५२ संवर्गातील २ हजार ७३९ रिक्त पदे भरण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. त्यासाठी ४ लाख ०५ हजार १६३ अर्ज प्राप्त झाले. राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८, अशा एकूण ५२ संवर्गांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून, मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी ८ उप संचालक मंडळे आहेत. रविवारपर्यंत २ लाख ४१ हजार ५९० उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत. यापैकी २ हजार ८६९ उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत.

मागितलेल्या परीक्षा केंद्राऐवजी वेगळे व दूरचे केंद्र देण्यात आले असल्याची तक्रार अनेक उमेदवारांनी नोंदविली आहे. त्याबाबत डॉ. पाटील म्हणाल्या, परीक्षार्थीना परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून, उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो, त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित आहे. ही अट ठेवली नाही तर कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावात बसून, राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एकतर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा नंतर बदली मागतील. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल. या पुर्वानुभवामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या परीक्षांसाठी दोनदा अर्ज, परीक्षा शुल्क भरुनही परीक्षा एकाच वेळी होत असल्याने इतर ठिकाणी परीक्षा देता येणार नसल्याच्या तक्रारींबाबत त्या म्हणाल्या, परिक्षार्थीनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागात, जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यांच्या सोयीनुसार व्यवस्था करावयाची झाल्यास प्रत्येक मंडळ व सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या १४ रविवारी घ्याव्या लागतील. हीच बाब ५२ संवर्ग आणि १४ नेमणूक अधिकारी/कार्यालयांबाबत ठरवायची झाल्यास या परीक्षा दीड ते दोन वर्ष चालतील. त्यामुळे ५२ संवर्गांच्या परीक्षा २ शिफ्टमध्ये घेण्यात येत आहेत. तसा उल्लेखसुद्धा जाहिरातीत अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केलेला आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी यातील पहिल्या शिफ्टमध्ये १० वी ते १२ वीपर्यंत शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्टमध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले आहेत. दरम्यान, फोटो व सही अस्पष्ट असल्यामुळे प्रवेशपत्र न मिळालेल्या परिक्षार्थीना 'न्यासा'शी संपर्क साधण्यास कळविले असल्याचेही त्यांनी या वेळी नमुद केले.


नागपूर की नागापूर..?

अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागापूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे नागपूर आणि नागपूर यातील नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला आहे. मात्र, त्यात दोन्ही ठिकाणी जिल्हा नमूद केला आहे.

- डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या