आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 27 फेब्रुवारीला


पुणे प्रतिनिधी

35वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 27 फेब्रुवारी 2022 रोजी रंगणार आहे.  देशातील मॅरेथॉन शर्यतीची जननी असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनात कोविडमुळे खंड पडला होता. क्रीडाक्षेत्र ठप्प पडले असल्याने 2020 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. सध्या कोविडची साथ ओसरत आहे. तरीदेखील स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारऐवजी पुढील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी आम्ही ही शर्यत आयोजित करणार आहोत. पुणे महापालिकेशी योग्य तो समन्वय साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड सुरक्षेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही शर्यत होईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष  अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.

या शर्यतीसाठी 15 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नावनोंदणीला सुरुवात होईल, असे सांगून रेस डायरेक्टर सुमंत वाईकर म्हणाले की, "शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.marathonpune.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे शर्यतीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल. 31 जानेवारीपर्यंत नावनोंदणी करता येईल. 

व्हॅक्सिनेशन पूर्ण केलेल्या 18 वर्षांपुढील स्पर्धकांनाच एन्ट्री

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने खेळाडूंच्या सुरक्षेला कायम प्राधान्य दिले आहे. यावेळी कोविडकाळात खेळाडूंच्या सुरक्षेकडे आम्ही आणखी काटेकोरपणे लक्ष देणार आहोत. या शर्यतीदरम्यान शासकीय नियम आणि खेळाडूंचे आरोग्य, याविषयी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. व्हॅक्सिनेशन पूर्ण केलेल्या म्हणजे लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या 18 वर्षांपुढील खेळाडूंनाच यंदाच्या शर्यतीसाठी प्रवेश दिला जाईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष  अॅड. अभय छाजेड यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या