'वॅक्सीन ऑन व्हील्स' या उपक्रमांतर्गत 3 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण


पुणे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने वेगाने लसीकरण करण्यासाठी 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' या उपक्रमाअंतर्गत विविध समाज घटकांसाठी घरी अथवा कामाच्या ठिकाणी जाउन लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत तब्बल 1 हजार 313 कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून 3 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष असे की झोपडपट्टयातील नागरिक आणि बांधकाम मजूरांनी या उपक्रमांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला असून यूपीएससीचे विद्यार्थी व जिम ट्रेनरसाठी आयोजित कॅम्पसला नगण्य प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रामुख्याने बांधकाम मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, वृद्धाश्रम, दिव्यांग, धर्मगुरू, तृतीयपंथी, देवदासी, बेघर, घरेलू कामगार, बांधकाम मजूर, पथारीवाले, फेरीवाले, दुकानदार, भाजी विक्रेते, आंथरूणाला खिळलेले रुग्ण, एनजीओ, मिडीया, परदेशात जाणारे विद्यार्थी व नागरिक, कलाकार, यु.पी.एस.सी.चे विद्यार्थी, जिम प्रशिक्षण व बॉडी बिल्डर अशा विविध घटकांतील नागरिकांसाठी त्यांच्या ठिकाणी जावून लसीकरण करण्यात आले. बांधकाम मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, कलाकार, घरेलू कामगारांनी या उपक्रमाला शंभर टक्क्यांहून अधिक प्रतिसाद दिला. तर अन्य क्षेत्रातील नागरिकांच्या कॅम्पच्या ठिकाणी हेच प्रमाण 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास राहीले. मात्र, युपीएससीचे विद्यार्थी आणि जिम ट्रेनरसाठी घेतलेल्या कॅम्पला अत्यल्प प्रतिसाद आहे.

संपुर्ण देशभरात 16 जानेवारीला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. लसीच्या उपलब्धतेनुसार प्राथमिकता ठरवून लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, काही कालावधीत अधिकाअधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी स्थानीक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या. महापालिकेनेही व्हॅक्सीन ऑन व्हील्स या  विशेष मोहीमेअंतर्गत समुहगटांसाठी लसीकरण कॅम्पांचे आयोजन केले. यानुसार संबधीत समुहांकडून अथवा संस्थांकडून लसीकरणासाठी संख्यात्मक मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत विविध घटकांनी व संस्थांनी 2 लाख 79 हजार जणांच्या लसीकरणाची मागणी नोंदविली. मात्र, प्रत्यक्षात तब्बल 3 लाख 11 हजार 653 जणांचे लसीकरण करण्यात आल्याने या उपक्रमाला शंभर टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या