नगर जिल्ह्यातही लक्ष्मी प्रसन्न : विखे पाटील यांचा दावा
लोणी
आयकर विभागाने 1 हजार 50 कोटी रुपयांच्या समोर आणलेल्या घोटाळ्यात राज्यासह नगर जिल्ह्य़ातील ‘कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले’ हे लवकरच समोर येईल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीवर निशाणा साधताना भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारचा रिमोट कंन्ट्रोलही आता दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्याने मुख्यमंत्री हतबल झाल्याची टिका त्यांनी केली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत आहेत. तसेच काही मंत्री व त्यांच्या कुटूंबीयांची आयकर विभाग, ईडी आदी संस्थांकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांसंदर्भात गौप्यस्फोट केला. त्यात नगर जिल्ह्यातील कुणाचे नाव समोर आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्तेवर आल्यापासुनच महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. या घोटाळ्यांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन, केवळ दिशाभुल करण्याचे काम मंत्र्याकडून सुरु असून, कालचा महाविकास आघाडीचा बंद हा त्याचसाठी होता. परंतु राज्यातील सुज्ञ जनतेने या महाराष्ट्र बंदला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा दावा आ. विखे पाटील यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची मालिकाच समोर आली आहे. राज्याच्या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्या हिताचा आता राहिला नसल्याची टिका आ. विखे पाटील यांनी केली.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचे समर्थन नाहीच परंतु या घटनेतील वास्तविकता चौकशीतून समोर येईलच. या घटनेचे भांडवल करुन, महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा खटाटोप हा नाकर्तेपणा दाखविणारा ठरला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे संसदेत मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक मात्र त्यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत, शिवसेनेच्या खासदारांनी सोईनुसार गप्प बसण्याची भूमिका घेतली. आता फक्त राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न जनतेच्याही लक्षात आले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
0 टिप्पण्या