'त्या' वक्तव्याचा विपर्यास करू नये : हर्षवर्धन पाटील


इंदापूर  प्रतिनिधी

मावळ येथे एका हॉटेल उद्घाटनासाठी गेलो असताना तिथे मी जे वक्तव्य केलं त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.मी भाषणांमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही आणि कोणाच्याही नावाचा उल्लेख करणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे 'त्या' अर्थाचा अनर्थ करू नये असा खुलासा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ( दि.१३ ) इंदापूर अर्बन बँक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, दुसरा मुद्दा असा आहे की, मला विधानसभेला टिकीट द्यायचे ठरलं होतं ते नाकारल्याने शेवटी मला माझा राजकीय निर्णय घ्यावा लागला म्हणून मी भाजपा मध्ये गेलो. एवढाच त्या पाठीमागचा अर्थ आहे म्हणून त्या अर्थाचा कोणीही विपर्यास करून वेगळा अर्थ काढू नये.

काय आहे हे प्रकरण

सोमवारी ( दि.११ ) मावळ तालुक्यातील सोमाटणे टोलनाका येथे राजवर्धन वाडा हॉटेल उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मावळचे आमदार सुनील शेळके, तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये यावे लागले. आमदार शेळके यांनी मला विचारले की, तुम्ही भाजपामध्ये का गेलात ! मी त्यांना म्हणालो मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेले ! तेव्हा शेळके म्हणाले तेवढं सोडून बोला.तेव्हा मी ही त्यांना तेवढं सोडून विचारा म्हणालो. मी सध्या मस्त आहे.निवांत आहे.मला शांत झोप लागते. कोणती चौकशी नाही, काही नाही असे हर्षवर्धन पाटील म्हणाले होते.त्यावरून होणाऱ्या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या