कोरोना ने जीव गेले, मात्र मोदी सरकार सेलिब्रेशनमध्ये व्यस्त


पुणे प्रतिनिधी

भाजपाला सत्तेची गुर्मी चढली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष गेले. असे असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती लसीकरणाचे सेलिब्रेशन करत असेल तर दुर्दैवी आहे. कोरोनावर त्यांना प्रभावी ऊपाय करता आले नाहीत, उपचारांमध्येही भ्रष्टाचार केला. लक्ष दुसरीकडे वळवायचे म्हणून असले ऊद्योग त्यांना सुचतात.साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी सांगितले.पत्रकार संघातील कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर पटोले बोलत होते.

भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला. निवडणूक कशी लढणार हे आम्ही एकदा सांगितले आहे, त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. काही गोष्टी सांगता येत नाहीत. संजय राऊत काय म्हणाले किंवा आणखी कोणी काय म्हणाले यावर आम्ही बोलणार नाही. आमचे ठरले आहे, काम सुरू आहे असे सांगत पटोले यांंनी निवडणूक विषयावर बोलणे टाळले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या