शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास गुन्हे दाखल करू

उपमुख्यमंत्री पवार यांनी भरला विमा कंपन्यांना दम । मोदींचे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत स्वागत


मुंबई

शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर अशा कंपन्यांवर सरकार गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडंवाकडं करा, असं काही सांगत नाही पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कास्तकऱ्याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बीडमधील काँग्रेसचा प्रमुख नेता राष्ट्रवादीत

काँग्रेसचे बीड येथील माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. 'बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाईची नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पीक विम्याबाबत प्रतिक्रिया दिली व विमा कंपन्यांना थेट इशारा दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या