ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी बामसेफची भारत बंदची हाक


इंदापूर  प्रतिनिधी

केंद्र सरकार गेले कित्येक वर्षे मागणी करूनही ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करीत नाही. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी येत्या १० डिसेंबर ला भारत बंद करणार असल्याची घोषणा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी इंदापूर मध्ये केली आहे. शनिवारी (दि.१६) रोजी इंदापूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

वामन मेश्राम बोलताना पुढे म्हणाले की,बामसेफ च्या माध्यमातून १० डिसेंबर ला भारत बंद करुन देशातील संपूर्ण ओबीसी बांधवांना या मुद्द्यावर जागृत करणार आहे.ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसंदर्भात आपणांस आता संविधानिक मार्गाने लढा द्यायचा आहे.५२ टक्के ओबीसी हा काही वेगळा वर्ग नसून तो समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे.या सर्व लोकांना सोबत घेण्याचा विचार करणे म्हणजे विचार परिवर्तन होय.

कोण म्हणत असेल की तो माझ्या धर्माचा नाही अरे पणं तो तुमच्या डी.एन.ए.चा आहे हे विसरता कामा नये.कारण धर्म बदलता येतो मात्र डी.एन.ए.बदलता येत नाही.तेव्हा ओबीसी मध्ये मोडणारे सर्व लोक हे आपले लोक आहेत असा विचार करुन आपणांस लढा द्यावा लागेल तेव्हा विचार परिवर्तन झाले असे म्हणता येईल.या निमित्ताने आता सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.केवळ विचार करुन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.इतरांनाही त्यामध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करा.असे आवाहन ही मेश्राम यांनी यावेळी केले.

यावेळी बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रदेशाध्यक्ष भंते शांतिरत्न,इं.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष मगन ससाणे, बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे,प्रोटाॅन चे राष्ट्रीय प्रभारी गोरखनाथ वेताळ,भारत मुक्ती मोर्चा राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे,बामसेपचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंदराव थोरात,भारतीय विद्यार्थी मोर्चा पुणे जिल्हा प्रभारी सुरज धाईंजे आदींसह सहयोगी संघटनांचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या