गाळेधारकांवर नगरपालिका मेहरबान

 


भोर 

नगरपालिकेने पालिकेच्या नूतन इमारतीत २२ व्यावसायीक गाळे (दुकाने)तयार केले आहेत.यापैकी लिलाव पद्धतीने ११ गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले असून पूर्ण अनामत रक्कम न स्वीकारता तसेच गाळ्यांचे वीजबिल पालिका भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.११ गाळ्यापैकी काही गाळे नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाईकांना मिळाल्याने नगरपालिका गाळेधारकांवर मेहरबान होत असल्याने सामान्य नागरिकांनी मात्र चीड व्यक्त केली आहे.

नगरपालिकेच्या वतीने प्रतिचौरस २०३१ याप्रमाणे गाळ्याना साडेचार लाख रुपये अनामत रक्कम आकारली होती.मात्र संबंधित गाळेधारकांना केवळ एक लाख रुपये अनामत रक्कम देऊन दोन गाळे घेतले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित एवढ्यावरच थांबले नसून दोन गाळ्यामधील भिंत तोडून एक गाळा करून अन्य व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिला आहे. सर्व सामन्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पालिका प्रशासनाचा सध्याचा कारभार म्हणजे सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि पूर्ण सत्ता माणसाला पूर्ण भ्रष्ट करते याचा प्रत्यय देत आहे. सध्या पालिकेवर एकाच राजकीय पक्षाची पूर्ण सत्ता असून विरोधक  नसल्याने बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. व्यावसायीकांना नाममात्र अनामत रक्कम घेवून भाडेतत्वावर गाळे दिले आहेत. मात्र गाळेधारकांना विज मीटर, स्वच्छतागॄह, पार्किंग व्यवस्था पुरवण्याबाबत पालिका उदासीन दिसते. वीज मीटर पालिकेने दिले नसल्याने गाळाधारकांचे वीज बिल पालिका भरत आहे.उत्पन्न वाढविण्याऐवजी पालिका कररूपाने गोळा केलेले सामान्यांचे पैसे उडवत असल्याने भोरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पालिका मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना विचारले असता संबंधितांकडून अनामत रक्कम लवकरच वसूल केली जाईल असे सांगण्यात आले.मात्र दोन गाळामधील भिंत तोडून इमारतीला धोका पोहोचविणाऱ्या संबंधित गाळेधारकांवर पालिका काय कारवाई करते की ,सगळे मुसळ केरात (पाण्यात) जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या