भ्रष्टाचार लपवणे अवघड झाल्याने केंद्रावर आरोप : आ. विखे पाटील

वयोश्री योजनेच्या शिबिरास श्रीरामपुरात प्रतिसाद


श्रीरामपूर

राज्य सरकारमधील मंत्र्यांना भ्रष्टाचार लपवणे अवघड झाले. त्यामुळे ते केंद्र सरकारवर आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसांना या सरकारची कुठलीही मदत होत नाही, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आणली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून जनसेवा फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग विभागातर्फे येथे वयोश्री योजनेद्वारे विविध साधनांकरीता आयोजित तपासणी शिबिर रविवारी पार पडले. त्यात ते बोलत होते. माजी सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, नितीन दिनकर, प्रकाश चिते, केतन खोरे, भाऊसाहेब बांद्रे, शरद नवले, कल्याणी कानडे, सुनील साठे, गिरिधर आसने, मारुती बिंगले, गणेश राठी, सतीश सौदागर,  दीपक बाराहाते, जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आमदार विखे पाटील यांनी प्रत्येक कक्षात पाहणी करून तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची चौकशी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर विखे पाटील यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरिकांना समर्पित झाला आहे. केंद्राने मोफत कोविड लस उपलब्ध करुन दिली, असेही त्यांनी सांगितले.

पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर श्रीरामपूर तालुक्याने नेहमीच प्रेम केले. त्या प्रेमाची कृतज्ञता म्हणून वयोश्री योजनेचा प्रारंभ येथून केला. पुढील आठवड्यात राहाता, संगमनेर येथेही शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली समविचारी कार्यकर्त्यांबरोबर एकत्रपणे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न आहे. माजी आमदार स्वर्गीय जयंत ससाने आणि माझी मैत्री सर्वश्रुत होती मात्र त्यांच्यानंतर येथील काँग्रेसचे संघटन संपले. आता शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांना अपेक्षित विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

'ते' शरद पवारांचे फ्रस्ट्रेशन

शरद पवार हे मोठे नेते आहेत. राज्यातील नेत्यांवर टीका करणे त्यांना शोभत नाही. मात्र त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. त्यातून त्यांचे फ्रस्ट्रेशन दिसून येते. तीन पक्ष एकत्र असूनही भाजपपुढे टिकाव लागत नाही, म्हणून स्वायत्त संस्थांच्या नावाने ते बोटे मोडतात, अशी टीका आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या