‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ प्रमाणे आमचे सरकार : ना. ठाकरे

दंडकारण्य अभियान आनंद मेळावा; ना. थोरात मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार 


नगर 

‘महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमेकांशी साखरेएवढे गोड संबंध आहेत. सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी तसे तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले. या तीन पक्षांत शहरी आणि ग्रामीण भागात कामाचा चांगला अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे,’ अशी उपमा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दिली. 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे कौतुक करताना आदित्य ठाकरे यांनी ना. थोरात यांचे कौतुक केले. थोरात यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन मिळते. संगमनेरचा विकास पाहून राज्यात याप्रमाणे काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाल्याचे ते म्हणाले. 

‘वातावरण चांगले असले की विकासाला वाव मिळतो. महाविकास आघाडीच्या सकारमधील तिन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण आहे. मुळात शिवसेनेचा स्वभावच असा आहे की, आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे करत नाही. कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही. आमचे मन साफ आहे. त्यामुळे आधीपासूनच सर्वांशी संबंध चांगले होते आणि त्याचाच उपयोग झाला व आम्ही एकत्र आलो', असे आदित्य म्हणाले.

महाविकास आघाडीबद्दल ते म्हणाले, ‘तीन अनुभवी पक्ष यामध्ये एकत्र आले आहेत. शिवसेनेला प्राधान्याने शहरी भागातील अनुभव आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ग्रामीण भागातील जास्त अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवांचा फायदा शहरी आणि ग्रामीण भागातील धोरणे राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी होत आहे. अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला बेस्ट ऑफ इलेव्हन असा क्रिकेटचा संघ असतो, तसे हे सरकार आहे. त्यामुळे राज्यात प्रगती होत राहणारच. येथे मी मंत्री नव्हे तर आमदार म्हणून आलो आहे. ग्रामीण भागातील कामे मला समजून घ्यायची आहेत, त्याची आमच्या मतदारसंघात कशी अंमलबजवणी करता येईल, ते पहायचे आहे. फक्त पुढे जाण्यात अर्थ नाही, कसे पुढे जायचे, याचे नियोजन करून पुढे गेले पाहिजे,’ असेही ठाकरे म्हणाले. संगमनेर, कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेसही आदित्य यांनी भेट दिली. राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेची ओळख असून येथील विद्यार्थ्यांशी आदित्य यांनी अतिशय मनमोकळा संवाद साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या