केरळमधे पावसाचे तांडव

भूस्खलनामुळे 21 जणांचा मृत्यू


तिरुवनंतपूरम 

केरळमध्ये रविवारी, परतीच्या पावसाने हाहाःकार उडाला. अनेक जिल्ह्यांमध्ये  पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला. कोट्टायममध्ये 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिक लोकांनी रविवारी सकाळी कूट्टीकल आणि कोक्कायार पंचायत भागात बचाव कार्य सुरू केले. शनिवारपासून मुसळधार पावसासह अनेक भूस्खलनामुळे 12 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.

कोट्टयम, इडुक्की आमि पथनमथिट्टा इथल्या पर्वतीय भागात पूर आला असून मीनाचल आणि मणिमाला या नद्या ओसंडून वाहत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे की, अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातल्या काही नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

 धरण आणि नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. नागरिकांना घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. पथनमथिट्टा, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. थिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोडे आणि वायनाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या