१५ दिवस लोहगाव विमानतळावरील उड्डाणे बंद


पुणे प्रतिनिधी

विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद राहणार आहेत. आजपासून (१६ऑक्टोबर) १५ दिवस पुण्यातील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा १६ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामूळे २९ ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

लोहगाव विमानतळ बंद राहण्याची घोषणा प्रशासनाने फक्त १०दिवस अगोदर सांगितल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. या निर्णयाचा फटका १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात रात्रीची उड्डणे बंद केल्याने हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरून तब्बल ६३ विमानांची उड्डाणे झाली. यात ९८०३ प्रवासी पुण्याहून दुसऱ्या शहरांत गेले तर ८५२४ प्रवासी पुण्यात दाखल झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या