देशातून मान्सून परतला


नवी दिल्ली

गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने निरोप घेतल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आज संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.

खरंतर, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच केरळात मान्सूनने दिमाखात आगमन केले होते. त्यानंतर दोनच दिवसात मान्सूनचा पाऊस मुंबईत येऊन धडकला होता. मान्सूनच्या सुरुवातीला कोसळलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पुरती धांदल उडाली होती. अनेक रस्त्यावर पाणी साचून संपूर्ण मुंबईत पुरजन्य स्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढले.

6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरू झालेल्या पावसाने राज्यात थैमान घातले होते. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या