चार राज्याचा राज्य पक्षी शिवरूप "नीलकंठ" अडचणीत


शिरुरकासार । प्रशांत बाफना

पृथ्वीवर साक्षात भगवान शिवाचे प्रतिनिधी मानला गेलेला व आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओरिसा व तेलंगणा या चार राज्याचा राज्य पक्षी असलेला निलकंठ पक्ष्यांवर सध्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव ,ता.शिरूर कासार जी बीड येथे उपचार सुरू आहेत.

बीड येथील ऋषिकेश खेपकर यांना हा पक्षी बीड येथे घायाळ अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात संपर्क करून सर्पराज्ञी चे स्वयंसेवक डॉक्टर शशिकुमार सवाई यांच्याकडे स्वाधीन केला. त्यानंतर डॉक्टर सवईनी पुढील उपचारासाठी त्यास सर्पराज्ञी दाखल केले. सध्या या नीलकंठ पक्षाची प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यास निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली. या पक्षा विषयी अधिक माहिती देताना सृष्टी सोनवणे म्हणाल्या की, या पक्षास निळकंठ ,चाष ,नीलपंख या नावाने ओळखले जाते. शिवाय या पक्ष्यास धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. या पक्षास साक्षात भगवान शिवशंकराचे पृथ्वीवरील रूप मानले जाते. हा पक्षी आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा व ओरिसा या चार राज्यांचा राज्य पक्षी आहे. तसेच या पक्षास शुभ व भाग्यतेचे प्रतीक मानले जाते. भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध ज्यावेळी केला होता त्यावेळी या पक्ष्याचे दर्शन रामास झाले होते असे मानले जाते. या पक्षात दसऱ्याच्या दिवशी पाहणं हे अत्यंत शुभ मानले जाते .असेही सृष्टी सोनवणे यांनी सांगितले.

कीटकनाशकाचे विष पचवण्यास निळकंठ असमर्थ

"शेतामध्ये बेसुमार किटकनाशकांच्या वापरामुळे या पक्षाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे .कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषारी झालेले किडे खाल्ल्याने या पक्षाचे अस्तित्व आज धोक्यात आलेले आहे . जगाच्या कल्याणासाठी शिवशंकराने समुद्रमंथनातून निघालेले विष पिऊन ते विष पचवले तेव्हा पासून ते नीलकंठ झाले , त्याच प्रमाणे या पक्ष्याचाही गळा निळा असल्याने यास नीलकंठ नाव पडले असावे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील कीटक खाऊन त्यांचे विष पचवतो. मात्र कीटकनाशकाच्या फवारणीतुन विषबाधा झालेले कीटक पचवण्यास नीलकंठ असमर्थ ठरत आहे."

- सिद्धार्थ सोनवणे, वन्यजीव अभ्यासक 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या