नगर प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कार्य सुरु झाले असताना या महामार्गाच्या माध्यमातून रोजगार व निवार्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला खडकाळ जमीनीवर पाच-पाच कि.मी. चे असे एकूण दहा कि.मी. रुंदीचा गडकरी विकास पट्टा निर्माण करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
सध्या देशात घरकुल वंचितांचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट बनला आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कार्य नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या महामार्गावर पाच-पाच कि.मी. चे असे एकूण दहा कि.मी. चा गडकरी विकास पट्टा विकसीत केल्यास खडकाळ नापीक जमिनीवर नव्या शहरांची उभारणी व औद्योगिक वसाहती उभारता येणार आहे. यासाठी लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना प्रभावी ठरणार असून, घरकुल वंचितांना बाजारभावाच्या कमी किंमतीत घरे तर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये परराष्ट्रीय उद्योजक गुंतवणूकीसाठी तयार असून, केंद्र व राज्य सरकारने याला चालना दिल्यास रोजगाराचा व खडकाळ जागेवर घरकुल वंचितांचा प्रश्न सुटणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी अॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.
0 टिप्पण्या