विभागीय आयुक्तांच्या आदेशाचा मनसेकडून निषेध
नगर
नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी फटाकेबंदी संबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराव करण्याच्या सूचना केल्या आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर येथे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाकेबंदीला आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत फटाके फोडूनच आपला निषेध नोंदविला. फटाकेबंदी म्हणजे हिंदुत्वावर घाला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरविण्यासाठी यावर अचानक बंदी घातली तर सर्वांचे मोठे नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना फटाक्यांचे प्रदूषण सहन होत नसेल तर दिवाळी होईपर्यंत त्यांनी परदेशात निघून जावे, अशी टीका मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे.
विभागीय आयुक्तांनी महापालिकेला फटाकेबंदीचा ठराव करण्यास कळविले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्यावतीने बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. तेथे फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेना प्रमुख परेश पुरोहित, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, अशोक दातरंगे, समर्थ उकांडे, संकेत होशिंग, अक्षय नक्का यावेळी उपस्थित होते.
भुतारे म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे अनेक सण-उत्सवावर शासनाने बंदी घातली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना राज्य सरकारने जवळ-जवळ सर्वच निर्बंध उठविले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून रोजगार, उद्योग-धंदे रुळावर येत आहेत. दिवाळी हा सर्वांत मोठा व आनंदाचा सण आहे. या सणात फटाके महत्त्वाचा घटक आहे. त्यावर बंदी घालणे म्हणजे सरकार पूर्णत: हिंदू विरोधात काम करत असल्याचे दिसते. फटाका उद्योगावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. दिवाळी तोंडावर असताना अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून फटाक्यांची खरेदी केली आहे. फटकेबंदी निर्णयास आमचा विरोध आहे. आम्ही फटाके वाजविणारच जर त्यास विरोध झालाच तर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात फटाके उडवू, असा इशाराही भुतारे यांनी यावेळी दिला.
0 टिप्पण्या