दोन दिवस राज्यपाल कोश्यारी नगर जिल्हा दौऱ्यावर

राहुरीत पदवीदान, लोणीत मुक्काम, राळेगण-हिवरेबाजारला भेट 
नगर

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होणार आहे. लोणी येथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असून २७ ऑक्टोबरच्या रात्री विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्रामगृहात त्यांच्या मुक्कामाचे नियोजन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी ते राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. आदर्शगाव हिवरेबाजारला ते भेट देणार असून तेथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.

लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या नव्या ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन, डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचे नियोजनही लोणीतच सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या