विमानतळाचा विस्तार अडकला लाल फितीत


पुणे प्रतिनिधी

पुण्यासारख्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या शहराला नागरी विमानतळ नसणे ही नामुष्की आहे. मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षाच्या कार्यकाळात 62 विमानतळे बांधण्यात आली. मात्र पुणे विमानतळाचा विस्तार अजूनही लाल फितीत अडकला आहे. शहराला हक्काचा विमानतळ असणे ही पुण्यातील नागरिकांची दीर्घकालीन आणि वाजवी मागणी आहे. 

सध्याचा विमानतळ भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) स्थानकात कार्यरत असलेले नागरी एन्क्लेव्ह आहे. १९३९ साली ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने दुसऱ्या महायुद्धादरम्यान मुंबईला हवाई संरक्षण देण्यासाठी पुण्यात हवाई क्षेत्र स्थापन केले होते. सध्याचे विमानतळ भारतीय हवाई दलाच्या स्थानकाचा एक भाग म्हणून कार्यरत आहे. असे काम करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास आणि विद्यमान सुविधांचा विस्तार. तथापि, 'आयएएफ़'' आणि 'एएआय'' यांच्यातील कायदेशीर समस्यांमुळे हा प्रस्ताव गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित आहे.

विमानतळावरील कार्गो टर्मिनलचा विकास जमिनीच्या अनुपलब्धतेमुळे प्रलंबित पडला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे 18 एकर जमीन हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. अलीकडेच २.५ एकर जमीन हस्तांतरित करण्याची घोषणा करून या दिशेने छोटेसे पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु या जमिनीच्या तुकड्यासाठी देण्यात येणाऱ्या वार्षिक भाड्यावरून दोन्ही मंत्रालयात वाद सुरू आहेत. पुढील अडथळा म्हणजे विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाची उभारणी करणे. 

एखाद्या शहराच्या आर्थिक वाढीसाठी सर्व सोयी सुविधांनी विकसित आणि २४ तास कोणत्याही हवामानात कार्यरत असणारा विमानतळ असणे ही मूलभूत गरज आहे. शहराच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांतील हा महत्त्वाचा दुवा असतो. दुर्दैवाने, पूर्णवेळ कार्यरत विमानतळ नसल्याने पुण्याच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होत आहेत.

पायाभूत सुविधां अभावी पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा नाही. सध्या हे विमानतळ ''कस्टम्स एअरपोर्ट'' म्हणून वर्गीकृत केले जाते. 

शहरे आणि बाजारपेठांमध्ये तयार झालेल्या दळणवळणाच्या सुविधा या महत्त्वपूर्ण असतात. ज्यामुळे शहरांमध्ये थेट गुंतवणूक, व्यवसाय वृद्धी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते.  पुण्याच्या तरुण पिढीच्या रोजगाराच्या संधी आणि आकांक्षाचेही नुकसान आहे. कोरोना साथीत पुणे विमानतळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

सुरुवातीला केवळ पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (एनआयव्ही) चाचणी सुविधा उपलब्ध होती. देशभरातून रक्ताचे नमुने पुण्यात आणले जात असत. नंतर सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोव्हिशील्ड लस या विमानतळावरूनच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. 

उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले होते, "दूरवरच्या भागात उपलब्ध झालेल्या हवाई दळणवळण सुविधा लोकांच्या स्वप्नाला पंख देत आहे". पुणे विमानतळाच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या सर्व भागधारकांनी एकत्र येऊन, पुणेकरांच्या स्वप्नाला पंख देण्यासाठी सामंजस्याने कृती करणे महत्त्वाचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या