ज्यांची जात काढता त्यांनीच मराठा आरक्षण दिले

पंकजा मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल 


औरंगाबाद 

'ज्या मुख्यमंत्र्यांची उठता-बसता जात काढली जात होती, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण हे दिलेलं आरक्षणही आताच्या सरकारला वाचवता आलं नाही. मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम यांनी केलं,' असा आरोप करून भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या विभागीय मेळाव्यात राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा नवा पेच राज्यात उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर ओबीसी मेळावे घेतले जात आहेत. औरंगाबादेत आज झालेल्या मेळाव्यात पंकजा यांनी भाजपने आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, हल्ली बहुजन शब्दाची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू आहे. इकडं बहुजन, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा उठवला की तिकडं मराठा आरक्षणाची चर्चा सुरू होते. हे षडयंत्र करणाऱ्यांनीच मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. ज्या मुख्यमंत्र्यांची रोज जात काढली जात होती, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र या सरकारनं तेही घालवून टाकलं. ओबीसींचं आरक्षणही संपुष्टात आलंय. आज आम्ही ते वाचवण्याचा प्रयत्न करतोय. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. एखादा ओबीसी उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडून येईल, पण त्याला मोक्याच्या जागेवर बसण्याची संधी मिळेल का?,' असा प्रश्नही पंकजा यांनी उपस्थित केला.

'वंचित आणि पीडितांना लाभ मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. त्यामुळं अनेक लोक मंत्री झाले. सरकार आलं आणि गेलं, पण समाजाला न्याय मिळत नाही. इतक्या वर्षांनंतरही आरक्षणासाठी माझा संघर्ष सुरूच आहे. ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे. राज्य सरकारनं जो ओबीसींसाठीचा अध्यादेश काढला आहे, तो टिकवून दाखवावा. ओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू नका, नाहीतर तुम्हाला बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या