गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकरांचा ‘आप’मध्ये प्रवेश


पणजी

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. बुधवारी त्यांचा हा पक्ष प्रवेश झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अनेकांनी मला पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. परंतु मी ‘आप’ची निवड केली, असे नार्वेकर यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या नार्वेकरांना पक्षात प्रवेश दिल्याने ‘आप’चे कार्यकर्ते चकीत झाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात गोव्यातील बडे नेते दयानंद नार्वेकर यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे.

20 ते 25 मतदार संघात त्यांचा चांगला प्रभाव असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून ‘आप’ने गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नार्वेकर यांच्या आम आदमी पार्टी प्रवेशाने आपचे कार्यकर्तेही गोंधळले आहेत. भ्रष्टाचारविरोधी पक्ष, अशी प्रतिमा असलेल्या ‘आप’मध्ये नार्वेकरांसारख्या भ्रष्टाचारी व्यक्तीला कसा काय प्रवेश दिला असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. 2002 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक दिवसीय सामन्यांची बोगस तिकिटे छापल्याच्या आरोपात नार्वेकर आहेत. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. 2009 ते 2012 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष असलेले दयानंद नार्वेकर यांच्यावर रियल इस्टेट घोटाळ्याचाही आरोप आहे. अशा व्यक्तीला आपने प्रवेश दिल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नार्वेकर 1977 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. 1985 ते 1990 दरम्यान ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदेही त्यांनी भूषविली आहेत. 35 वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या