पवार साहेब, किती हा भाबडेपणा?

फडणवीस यांना पवारांच्या हेतूबद्दल शंका


मुंबई
 

“द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !” असं विधान करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली.

उद्धव ठाकरे यांना पवारांनी मुख्यमंत्री  केल्याच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी शंका उपस्थित केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून हा वाद अधिकच चिघळत चालला आहे. आता फडणवीस यांनी थेट शरद पवार यांना टार्गेट केल्याने राजकीय वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण ऐकलं. त्या भाषणात त्यांनी काय भूमिका मांडायची ती मांडली. त्यानंतर त्यावर आज माजी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरील त्यांची मतं मांडली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, काही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे जे आघाडीचं सरकार झालं. ते सरकार बनवण्यामध्ये आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता, त्यात माझाही किंचित होता. माझाही त्यात सहभाग होता. मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला. आणि नंतर त्यांनी सांगितलं, ही गोष्ट सत्य आहे की त्यांचे वडील आणि मी सहकारी होतो. म्हणजे या लोकांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्र होते. बाळासाहेबांचे आणि माझे राजकीय मतभेद असायचे, पण व्यक्तिगत सलोखा हा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब एक दिलदार असे गृहस्थ होते. त्यामुळे या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं, म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या संघटनेने. आणि ज्यावेळी सरकार बनवण्याचा प्रसंग आला. त्यावेळे तीन पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करण्याचं ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पाडावं, असा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्याने मी सक्तीने त्यांचा हात वर केला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि त्यांची त्या ठिकाणी निवड झाली.”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या