जुन्या मुंबईची नवीन व्हिक्टोरिया मुंबईत धावणार


मुंबई 

ऐतिहासिक जुन्या मुंबईची आठवण करून देणारी व्हिक्टोरिया घोडागाडी आता नव्या स्वरूपात पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत धावताना दिसणार आहे. मात्र या गाडीला घोड्यांच्या टापांचा आवाज नसणार आहे. ही गाडी घोड्यांशिवाय असून ती बॅटरीवर येत्या शनिवार, ३० ऑक्टोबरपासून धावणार आहे. पर्यटकांचे आकर्षण असणारी व्हिक्टोरिया गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉईंट आणि गिरगाव चौपाटी या मार्गांवर उबो राईड्स आणि खाकी टूर्सच्या संयुक्त विद्यमाने धावणार आहे.

येत्या ३० ऑक्टोबरपासून ही व्हिक्टोरिया सफारी दर शनिवार आणि रविवार सायंकाळी ४ ते ६ या वेळेत चालणार आहे. एक सफर साधारण ५० मिनिटांची असेल. ही सफर काळाघोडा येथून सुरू होणार असून यातून मुंबईचा किल्ला आणि जुन्या वास्तूंचा इतिहास जाणून घेता येणार आहे. बॅटरीवर धावणाऱ्या या व्हिक्टोरिया गाडीचा वेग ताशी २० किमी प्रतितास असणार असल्याची माहिती खाकी टूर्सचे संस्थापक भरत गोठस्कार आणि उबो राइड्सचे सीईओ केतन आनंद यांनी दिली. हा ऐतिहासिक अमूल्य ठेवा काही वर्षांपासून बंद होता, मात्र सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या नव्या रूपातील व्हिक्टोरिया गाडीचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु मध्यंतरी कोरोनामुळे बंद ठेवावी लागणारी ही गाडी आता पुन्हा सुरू होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या