केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडत आहे. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता सरकार कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकार सर्व वाहन उत्पादकांना पुढील सहा-आठ महिन्यांत युरो-सहा उत्सर्जन नियमांनुसार फ्लेक्स-इंधन इंजिन बनवण्यास सांगेल.
फ्लेक्स-इंधन पेट्रोल आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे. भारतीय वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल पुढील 15 वर्षात 15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सर्व वाहन उत्पादकांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य केल्यानंतर वाहनांची किंमत वाढणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.
गडकरी यांनी सांगितले की, देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल.
इंधनाच्या दरवाढीमुळे सध्या देशातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरात कपात केली जाऊ शकते. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. तसे घडल्यास इंधनाच्या किंमतीत किमान दोन ते तीन रुपयांनी घट होऊ शकते.
जानेवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 35 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून इंधन दरकपात करुन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.
सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश
केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
0 टिप्पण्या