..म्हणून त्यांना दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी

ना. तनपुरे यांची खा. डॉ. विखे यांच्यावर टीका


नगर 

‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी आली आहे. कोणाची बॅलन्सशीट तपासायची असेल तर ते काम आम्हालाही येते,’ असा इशारा तनपुरे यांनी खा. डॉ. विखे पाटील यांना दिला.

दोन दिवसांपूर्वी खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरमध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यामध्ये विविध विषयांवरून विखे यांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केली होती. त्याला तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. तसेच भाजपच्या उपोषणाची खिल्लीही उडविली. ते म्हणाले, ‘राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वत:ची बॅलन्सशीट तपासण्यात व्यस्त असल्याने नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत नाहीत,’ अशी टीका नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती. त्यांना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज उत्तर दिले.

तनपुरे म्हणाले, ‘पालकमंत्री मुश्रीफ हे वैद्यकीय कारणामुळे जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. ते वयाने आणि अनुभावाने ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत, याचे तरी भान टीका करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. आपली बॅलन्सशीट तपासली जाईल, या भीतीने आधीच काही लोक भाजपमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील यांनी याची कबुली देताना आपल्याला भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते, असे नुकतेच म्हटले आहे. विखेही अशा निवांत झोप येणाऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी त्यांना येत असावी.’

भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडविचाना तनपुरे म्हणाले, ‘भाजपचे हे उपोषण निव्वळ स्टंटबाजी होती. सकाळी नाश्ता करून उपोषणाला आले आणि दुपारी जेवण करण्यासाठी घरी निघून गेले. हे कसले उपोषण? शेतकऱ्यांची काळजी होती तर निदान रात्रभर तरी उपाषणस्थळी बसायचे होते. आम्ही उन्हा-पावसात आंदोलने केली आहेत. मुळात भाजपच्या नेत्यांना उपोषणाची जास्तच हौस असेल तर त्यांनी ते दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात करावे, म्हणजे शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई तरी मिळेल. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्यांनी किमान माहिती घेऊन तरी आंदोलन करायचे होते.

नगर-मनमाड महामार्गाचे खड्डे दिसत नाहीत का?

खासदार विखे नगरच्या रस्त्यांवरील खड्डांवरून टीका करतात. मात्र, नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डे त्यांना दिसत नाहीत का? यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे जोर लावला पाहिजे. मात्र आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून,’ अशी त्यांची वृत्ती आहे, अशी टीकाही तनपुरे यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या