कवठे येमाई प्रतिनिधी
शिरूरच्या बेट भागातील शरदवाडी परिसर व पारनेर तालुक्यातील गावांना वरदान ठरणारा कुकडी नदीवरील शरदवाडी बंधारा अद्याप ही गेट न टाकल्याने कोरडा पडण्याच्या मार्गावर असून परिसरातील शेतीपिके धोक्यात येण्याची मोठीच चिंता शेतकऱयांना सतावत असल्याचे प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांतभाऊ जोरी यांनी सांगितले.
जोरी म्हणाले, शरदवाडी व परिसरात सध्या कांदा पिकाची लागवड सुरु आहे.याचबरोबर शेतकरी रब्बी हंगामातील गहू,हरभरा,चारा पिके व उसाची लागवड ही घेत आहेत.पाणी संपत आले तरी ह्या बंधा-यावर ढापे अद्याप टाकण्यात आलेले नाहीत त्यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता प्रशांत जोरी,पोपट सरोदे,जनार्धन सरोदे,विठ्ठल जोरी,काशिनाथ सरोदे,कोंडीभाऊ पोकळे,माउली सरोदे व इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून या बंधाऱ्यावरील ढापे तात्काळ टाकण्याची मागणी केली आहे.
" कुकडी पाटबंधारे विभागा अंतर्गत ७० लहान मोठे बंधारे आहेत. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्यावर ढापे टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आगामी दोन दिवासात कुकडी नदीवरील शरदवाडी बंधाऱ्यावरील ढापे टाकले जातील."
- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता,
कुकडी पाटबंधारे विभाग प्रकल्प - १ नारायणगाव
0 टिप्पण्या