परिवर्तनातून गाव दारूमुक्त करणार - पो.नि. राऊत


कवठे येमाई 

शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावात सूरु असलेले अवैध दारू, ताडी धंदे तात्काळ बंद व्हावेत. या उद्देशाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी नुकतीच येथील ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांसमवेत बैठक घेत अवैध दारू, ताडी विक्रेत्यांना हे बंद करण्याबाबत समज दिली. अवैध धंदे करणाऱ्यांच्यात परिवर्तन व्हावे व यापुढील काळात त्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करून जीवन चरितार्थ चालवावा या उद्देशाने त्यांच्यात परिवर्तन करून गावात अवैध दारू विक्री बंद करणारच व कवठे येमाई गाव १०० टक्के दारू,ताडी विक्री मुक्त करणारच असा संकल्प वजा इशारा पोलीस निरीक्षक राऊत यांनी यावेळी दिला. 

लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात सध्या २७ अवैध दारू,ताडी विक्री करणारे असल्याचे सांगत राऊत यांनी या सर्वांनी आगामी ८ दिवसांत स्वयंस्फूर्तीने हे धंदे बंद करावेत. अन्यथा पोलीस त्यानंतर आपल्या पद्दतीने कायदेशीर कारवाई करतील असा कडक इशारा ही दिला. गावात लवकरच पोलीस,ग्रामस्थ यांच्या समन्वयातून दारूबंदी कमेटी स्थापन करण्यात येणार असून त्या द्वारे प्रथम या अवैध दारू विक्रेत्यांचे मतपरिवर्तन करून दारू धंदे मुक्त गाव करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तर अशा प्रकारे परिवर्तन व्हावे म्हणून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातुन या उपक्रमाची प्रथमच सुरुवात करत असून येथील ग्रामस्थ या परिवर्तन उपक्रमास नाक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील व गाव १०० टक्के दारूबंदीमुक्त होईल असा विश्वास ही पोलीस निरीक्षक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

 तर गावाच्या वतीने पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे  कौतुक करीत पोलिसांच्या या परिवर्तन उपक्रमास ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील असा विश्वास उपस्थित दिला. सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर यांनी पोलीस प्रशासनाने दारूविक्री बंदी, दारूमुक्त गाव करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने प्रथमच कवठे येमाई गावात सुरू केलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी गावाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी,सहायक फौजदार नाजीम पठाण,भारमाळ व पोलीस सहकारी उपस्थित होते.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या