अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण शिबिरास सुरुवात


कर्जत 

पूर्व प्राथमिक वर्गांपासूनच बालकांना नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे आणि त्यांचा प्राथमिक, माध्यमिक, उच्च स्तरावर शैक्षणिक विकास सुलभ व्हावा या दृष्टीने सदरचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदारसंघातील बालकांना सुयोग्य शिक्षण आणि त्यांना घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध करून देत मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत व्हावा यासाठी सदरचा कार्यक्रम मतदारसंघात राबवत असल्याचे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी केले. ते कर्जत येथे अंगणवाडी सेविकांच्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिराप्रसंगी बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, बालविकास प्रकल्पाचे प्रशांत मिटकरी, नारायण हाकाळे उपस्थित होते.

कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ रोहित पवार विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवीत आहेत. राज्यामध्ये विकासाचे नवे मॉडेल म्हणून कर्जत-जामखेडची नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी शासन स्तरावर आणि स्थानिक पातळीवर प्रभावी उपक्रमांची अंमबजावणी केली जात आहे. जिल्हा परिषद अहमदनगर, प्रथम शैक्षणिक संस्था आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत- जामखेड येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम- अंगणवाडी व शाळा स्तर या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन मंगळवार, दि २६ रोजी दादा पाटील महाविद्यालयात करण्यात आले. यामध्ये मतदारसंघातील सर्व अंगणवाडी सेविकांचा सहभाग आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या