उरुळी कांचन प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर उरुळी कांचनमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून जनतेला पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे. दिवाळीच्या सणापुर्वीची साफसफाई, रंगरंगोटी आदी बाबींना पाण्याची जास्तीची गरज महिला वर्गाला असते पण उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन ही पार पाडायला अपयशी ठरत आहे अशी जळमळीत टीका महिला वर्गातून होत आहे.
दोन दिवसांपासून नव्या कालव्यात पाणी सोडले आहे पण ते फक्त १५० क्युसेकने सोडल्याने उरुळी पर्यंत यायला वेळ लागत आहे अशी माहिती माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण कांचन यांनी दिली.
मुळा-मुठा उजवा कालवा व बेबी कालवा मागील सुमारे महिन्याभरापासून बंद असल्याने उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या तीव्रतेने जाणवत आहे. गेल्या पंधरवड्यापासून उरुळी कांचन गावाच्या अनेक भागात दिवसातून एकदा तर काही भागात एक दिवसाआड ते पण कमी दाबाने तर काही भागात तीन - दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मुळा-मुठा कालव्याला पाणी आल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असे नेहमीचेच मिळमिळीत उत्तर ग्रामविकास अधिकारी वाय.जे.डोळस यांनी दिले, पण उरुळीची असणारी लोकसंख्या व वाढ होणारी लोकसंख्या याला लागणारी कायम स्वरुपाची पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने नियोजन बद्ध रीतीने शासनाकडे आमदार - खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजूर करून आणण्यात काय अडचण आहे याचा उलगडा गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी कांचनच्या सर्वसामान्य जनतेला अद्याप तरी काही होईना! अन कोणी करून देईना.
उरुळी कांचन गावाची पिण्याच्या पाण्याची सोय सध्यातरी पूर्णपणे मुळा-मुठा उजवा कालव्यावर अवलंबून आहे पण कोणीही राज्यकर्ते झाले तरी या बाबतीत ठोस व जनतेच्या उपयोगाचा निर्णय घेताना आजपर्यंत तरी कोणीच दिसत नाही हीच या गावाच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याबाबतची गेल्या २५ - ३० वर्षांपासूनची समस्या आहे ! यामुळे उरुळी कांचनची जनता व परीसरातील शेतकरी जुन्या व नव्या अशा दोन्ही कालव्यांना पाणी कधी सुटते याकडे डोळे लावून वाट पाहत बसले आहेत.
0 टिप्पण्या