भरदिवसा गॅंगवार ; गोळीबारात दोघांचा मृत्यू

दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीची हत्या


उरुळी कांचन  प्रतिनिधी

राहू (ता.दौंड )येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संतोष जगताप (वय ३८, रा.दहिटणे रोड, चव्हाणवाडी ,राहू , ता.दौंड‌.) याच्यावर भरदिवसा अज्ञात तिघा हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत खून केला. ही घटना उरुळी कांचन (ता.हवेली )येथे पुणे -सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनाई येथे दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्या दरम्यान बचावासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

राहू येथे बेकायदा वाळू उपशावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भर दिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात जामीनावर संतोष जगताप बाहेर होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हा आपल्या साथीदारांसह उरुळी कांचन येथे तळवाडी चौकातील सोनाई हॉटेल येथे चहा घेऊन बाहेर पडला होता. त्याचवेळी वेरना कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी संतोष जगताप हा आपल्या वाहनात बसत असताना संतोष वर एका पाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडल्या छातीवर , कमरेत व खुब्यात गोळ्या घुसल्याने संतोष गंभीर जखमी झाला. तर या हल्यात संतोषचा अंगरक्षक हा पण गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेतील संतोष जगतापने बचावासाठी हल्ले खोरांवर केलेल्या गोळीबारात स्वागत बापू खैरे (वय २५ रा.दत्तवाडी, उरुळी कांचन) या एका जणाचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या संतोष जगताप याला लोणी काळभोर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी तो मयत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात किती गुन्हेगारी प्रवृतीचे नागरिक राहत आहेत. त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या