सज्ञान अविवाहितेस गर्भपाताला परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल


मुंबई 

गर्भपात करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. पण 18 वर्षांवरील अविवाहित महिला अनावश्यक पद्धतीने गर्भवती झाली, तर अशावेळी बाळाचे संगोपन करणे अवघड बाब आहे. याप्रकरणी दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना गर्भवती तरुणीला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाने जे जे रुग्णालयातील वैद्यकीय पॅनेलचा अहवाल धुडकावत हा निर्णय दिला आहे.

एक 18 वर्षीय युवती अविवाहित असून 26 आठवड्यांची गर्भवती आहे. तिने गर्भपातास परवानगी द्यावी, यासाठी हाय कोर्टात धाव घेतली होती.

अनावश्यक पद्धतीने गर्भधारणा झाल्यामुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे गर्भपात करण्यास परवानगी द्यावी, यासाठी संबंधित तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत जेजे रुग्णालयातील वैद्यकीय पॅनेलने न्यायालयात एक अहवाल सादर केला होता. 'वैद्यकीय दृष्ट्या पीडित तरुणीच्या जीवाला कोणताही धोका नाही. तिचे मानसिक आरोग्य बिघडण्याची फारच कमी शक्यता आहे. त्यामुळे 18 वर्षीय युवतीचा गर्भपात करण्याची काहीही आवश्यकता नाही', असा अहवाल वैद्यकीय पॅनेलने न्यायालयात सादर केला होता. पण न्यायालयाने वैद्यकीय पॅनेलचा हा अहवाल धुडकावून लावत, याचिकाकर्त्या तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. 'मानसिक आजाराची व्याप्ती खूप मोठी आहे. याचा याचिकाकर्तीच्या मनावर परिणाम झाल्यास त्यातून बरं होणे खूप कठीण आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच याचिकाकर्ती मुलीची आर्थिक आणि सामाजिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे नको त्या वयात बळाला जन्म द्यायला लावणे, हे केवळ तिच्या भवितव्यावरच नाही, तर तिच्या कुटुंबीयांवरही विपरीत परिणाम करणारे आहे. पण दुर्दैवाने जेजे रुग्णालयातील वैद्यकीय टीमने मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले. अशी टिप्पणी करत न्यायालयाने याचिकाकर्त्या तरुणीला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या