Breaking News

महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी रोखण्यात सरकार अपयशी - चित्रा वाघ


पारनेर प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

राज्यात सातत्याने महिला,मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत.त्यांच्या हत्या होत आहेत.या हत्या,अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

तालुक्यातील जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटूंबाची आज (सोमवार) श्रीमती वाघ यांनी भेट घेऊन धीर दिला.भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटूंबियांकडे सूपूर्द केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे,सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे,कृष्णकांत बडवे,नगर शहराध्यक्ष भैया गंधे,नवनाथ सालके,

अमोल मैड,बबनराव आतकर,महेंद्र 

आढाव,शेखर सोमवंशी,जवळ्याच्या सरपंच अनिता आढाव,सोनाली सालके,गजानन सोमवंशी, प्रभाकर घावटे आदी यावेळी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या की,राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून अत्याचार झालेल्या महिलांना,मुलींना आर्थिक मदत करण्यात येते.त्याच धर्तीवर अत्याचार व हत्या झालेल्या महिला व मुलींच्या कुटूंबियांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. करण्यासंदर्भात राज्य सरकारची कोणतीही योजना नाही.वास्तविक पहाता मनैधैर्य योजनेच्या धर्तीवर हत्या झालेल्या मुलीच्या कुटूंबियांना आधार देण्याची योजना आखणे आवश्यक आहे.विशेष बाब म्हणून जवळे येथील पीडितेच्या कुटूंबाला राज्य सरकारने २५ लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी श्रीमती वाघ यांनी केली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या घटनेला सहा दिवस झाले तरी अद्याप गुन्हेगारांचा शोध लागला नाही ही चिंतेची बाब आहे.आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल अश्या पध्दतीने तपास करण्याची मागणी श्रीमती वाघ यांनी केली.पीडितेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या कोणालाच या प्रकाराबाबत काही माहिती नाही का.शेजाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का.कोणी दहशत निर्माण केली आहे का अश्या शंका श्रीमती वाघ यांनी व्यक्त केल्या.भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पीडितेच्या कुटूंबाला मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.


महिला,मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात पारनेर तालुक्यात यावे लागते हे दुर्दैवी आहे.येत्या आठ, दहा दिवसांत पीडितेच्या हत्येचा तपास लागला नाही तर आपण पुन्हा पारनेरला येऊन आंदोलन करू.पीडितेला व तिच्या कुटूंबाला न्याय मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.

- चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप


Post a Comment

0 Comments