Breaking News

पुढचं सरकारही महाविकास आघाडीचंच : पवार

भाजपला आव्हान ; फडणवीसांची उडविली खिल्ली


पुणे

'काहींनी मी पुन्हा येणार, अशा घोषणा दिल्या मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही दबावतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्ही काहीही करू शकता. तरीही आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि राज्यातील पुढचं सरकारही महाविकास आघाडीचंच असेल', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपवर तोफ डागली. मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी खिल्ली उडवली.

पवार म्हणाले,  केंद्र सरकारला सामान्य जनतेबद्दल आस्था नाही. इंधनाच्या किमतीत रोज वाढ होत आहे. इंधन हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचे साधन असा केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्राकडे ३ हजार कोटी थकले म्हणून तगादा पण, केंद्राकडे जीएसटीचे ३५ हजार कोटी थकले त्याचे काय? हा दुजाभाव नाही का? सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असून अजित पवार यांच्या तिन्ही भगिनींच्या घरांवरील छाप्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. यंत्रणेचा गैरवापर चालू आहे, असा दावा त्यांनी केला. संकटामागून संकटे आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धीराने मुकाबला केला. राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


No comments