मी धर्मांतर केले नाही : ज्ञानदेव वानखेडे

केंद्रीय मंत्री आठवलेंकडून पाठराखण


मुंबई

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणारे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे रोज सातत्याने नवेनवे गौप्यस्फोट करत असताना वानखेडे कुटुंबियांनी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना कागदपत्रे दाखविली. त्यावेळी मंत्री आठवले यांनी वानखेडे कुटुंबिय हे आंबेडकरी अनुयायी असल्याचे प्रमाणपत्र देत ते हिंदू-महार या मागासवर्गीय जातीतीलच असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली.

नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक हे वानखेडे कुटुंबियावर आरोप करत आहेत. परंतु मागासवर्गीय समाज वानखेडे कुटुंबियासोबत असून यापुढे त्यांनी कोणतेही आरोप करू नयेत असा इशारा आठवले यांनी मलिक यांना दिला.

वानखेडे हे मुळचे रिसोड तालुक्यातील असून ते हिंदू-महार या जातीतच जन्माला आल्याचे सांगत आपण कधीही धर्मांतर केले नसल्याचा दावाही वानखेडे यांनी यावेळी केला.  यावेळी मलिक यांनी प्रसिध्द केलेला निकाहनामा खोटा आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमानी उपस्थित केला असता ते म्हणाले की, तो निकाह नामा खोटा नाही. मात्र २७ वर्षानंतर तो कोण कुठला काझी काहीही सांगत असल्याचा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

नवाब मलिक यांचा जावई नशेडी आहे, त्यांची मुलगी नशेडी आहे. त्यांचे सारे कुटुंब या व्यवसायात आहे. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुली आणि जावयाकडे लक्ष देवून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

 भंगारवाले मलिक यांच्याकडे १०० कोटी आले कुठून?

मलिक हे एक खरेच भंगारवाले असून १०० रूपयांना नटबोल्ट विकणाऱ्या भंगारवाल्याकडे १०० कोटी रूपयांची मालमत्ता कशी आली असा सवाल करत त्यांच्या इतक्या मोठ्या संपत्तीची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी वानखेडे यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या