वाळू तस्कर सुसाट; प्रशासन मात्र झोपेत


श्रीगोंदा प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यामध्ये वाळू उपशाचे त्रांगडे झाले असून, तालुक्यातील एकाही वाळू ठेक्यातून उपसा करण्यास परवानगी नाही. तरीही अवैधरित्या उपसा करून विविध ठिकाणी वाळूचे साठे करून ठेवण्यात येत आहेत. नगरपरिषद आणि महसूल विभागाकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने तालुक्यातील वाळू तस्कर मोकाट झाले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील इतर गौन खनिजांबाबतही फारशी स्थिती वेगळी नाही. अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील डोंगर तसेच खदानीं मधून गौणखनिजांचा सर्रास उपसा करण्यात येत आहे. या प्रकाराला चाप बसवण्यासाठी प्रशासाकडून महिन्याला सरासरी 20 ते 25 कारवाया करण्यात येत असल्याचे शासन दप्तारातील नोंद सांगते. त्यातील काही प्रांताधिकारी करतात तर काही तहसीलदार कारवाई करतात वाळूचोरी, अवैध खदानींबद्दल झालेल्या प्रत्येक बैठकांमध्ये अधिकाऱ्यांची खरडपट्टी होत असली तरी, गौणखणिजाची चोरी रोखण्यात प्रशासनाला पूर्णपणे यश आलेले नाही. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ,वांगदरी आर्वी ,अनगरे कौठा, निमगाव खलू तसेच शहराच्या आजूबाजूला आंबिललोढा तसेच छोट्या मोठ्या नद्या ओढे नाले ,अश्या अनेक ठिकाणी अवैध वाळूसाठा करण्यात येत असून येथून वाळूची विक्री करण्यात येते. यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तालुक्याला खडी, कच पुरवठा एकाच पावतीवर महिनाभर होतो. या प्रकाराकडेही प्रशासन डोळेझाक करत आहे. गेल्यावर्षी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी वाळू तसेच गौणखनिजाची अवैध वाहतूक व साठे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर मोठी कारवाई झाली नाही. शहरात बेकायदा साठा करण्यात येणाऱ्या वाळूबाबत महसूल व नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना कुठेही जप्तीची कारवाई होत नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

चिरीमिरी जोरात

गेल्या काही वर्षांपासून वाळू उपशाचे त्रांगडे आहे. भरमसाठ दरामुळे ठेकेदार पुढे येत नाहीत. पर्यायाने चोरी करण्याचा सोपा मार्ग तस्करांनी अवलंबला आहे. आता न्यायालयाच्या निर्देशानंतर सध्या एकाही वाळू उपशाला परवानगी नाही. मात्र अवैध उपसा जोरदार सुरू आहे. वाळू लिलावामध्ये सहभागी न होता चिरीमिरी देऊन वाळू तस्कर सर्रास शहरात वाळू विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या