पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात सुमारे दोन तास बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड व गट विकास अधिकारी शीतल खिंडे यांनी फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पाथर्डी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांचे कामकाज अत्यंत संशयास्पद आहे. मागील काही महिन्यांपूर्वी अनेकांनी तक्रार अर्ज केले. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही नाही. याउलट सदर शिक्षणाधिकारी, आजही मी खूप राजकारण्यांच्या जवळचा आहे, माझे कोणीही काहीही करू शकत नाही अशा पद्धतीने बोलत आहेत. तसेच कामकाज करत आहे. त्यांचे दैनंदिन कामकाज पाहता ते तालुक्यामध्ये केवळ राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दोन प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये एका शिक्षकावर अदखलपात्र गुन्हा असूनही त्यांनी त्याला लगेचच निलंबित केले. मात्र दुसऱ्या एका प्राथमिक शिक्षकावर, एका महिलेवर अत्याचार केल्याचा कलम 376 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये त्या शिक्षकाला पोलिसांनी अटक देखील केली होती. सदर बलात्कारी शिक्षक दहा ते बारा दिवस जेलची हवा खाऊन आला आहे. आणि काल दिनांक 26 ऑक्टोबर 2021रोजी सदर शिक्षक पुन्हा थेट शाळेत हजर होऊन राजा हरिश्चंद्र सारखा रुबाबात फिरतोय, त्यामागचे नेमकी गौडबंगाल काय आहे कोणाला समजायला तयार नाही. मग या शिक्षकावर नेमकी मेहरबानी कोणाची आहे. असा संतप्त सवाल उपस्थित करून आंदोलकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था पाथर्डी शिक्षण विभागाची झाली आहे. म्हणून आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अविनाश टकले व संजय शिरसाट यांनी शिक्षणाधिकार्यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करून शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधीत शिक्षकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सध्या पाथर्डी पंचायत समिती मधील शिक्षण विभाग अनेक कारणाने चर्चेत येत आहे. शिक्षकांवर शिक्षणाधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने शाळा कमी आणि राजकारण जास्त अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे नियमित शाळा व विद्यार्थी घडवणारे शिक्षकांवर नेहमीच अशा लोकांकडून अन्याय होताना दिसत आहे.
0 टिप्पण्या