कंडक्टर गायकवाड यांचा प्रामाणिकपणा प्रवाशांना भावला


पुणे  

तिकिट तिकिट ही हाक एक नेहमी बसमध्ये ऐकू येते. बसमध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाना प्रवासाचे तिकिट प्रवास देऊन प्रवाशाचा प्रवास सुखकर करण्याचे काम बसचे कंडक्टर करत असतात. काही कंडक्टर या पलिकडे जाऊन काम करत असतात. पीएमपीएमलचे कायम असलेले कर्मचारी मधुकर वि्ठठल गायकवाड यांनी बसमध्ये हरवलेले कागदपत्राचे पाकीट प्रामाणिकपणे पुन्हा प्रवाशी महिलेला दिल्याची घटना मंगळवारी (ता.२६) सायंकाळी घडली.  

पीएमपीएलच्या नरवीर तानाजी वाडी डेपो कार्यालयाच्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या २४०२ या केंद्रावर पुणे महानगरपालिका ते तळेगाव ढमढेरे ही बस क्रमांक एमपीजी ७६ या क्रमांकाची बस तळेगाव येथून मनपा येथे सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान दाखल झाली होती. या बसमध्ये वाघोलीतील ममता टाकसाळे या महिलेने प्रवास केला होता. त्या दरम्यान या महिलेचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बॅकेचे एटीएम अशा विविध कागदपत्राचे पाकीट सायंकाळी बसमध्ये सापडले होते. त्यानंतर गायकवाड यांनी संबधित कागदपत्राची तपासणी करून त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कागदपत्राची माहिती दिली. सायंकाळी साडे सात वाजता ही बस पुणे मनपा वरून निघून तळेगाव कडे जात असताना वाघोली येथे केसनंद फाट्यावर कागदपत्राचे पाकीट बसमधील प्रवाशासमोर संबधित प्रवाशी महिलेला दिले. त्यामुळे हरवलेले कागदपत्राचे पाकीट मिळल्याने महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळी बसमधील प्रवाशांनाही कंडक्टर श्री गायकवाड यांचा प्रामाणिकपणा चांगलाच भावल्याने बसमध्ये अशाच व्यक्तीची गरज असल्याचे मत व्यक्त केली.

गेल्या वर्षीही बसमधील महिलेचे साडे तीन तोळेचे ब्रेसलेस चोराने लांबवले होते. त्यावेळी गायकवाड यांनी चोराला पकडून लोणिकंद पोलिस स्टेशनमधील पोलिसाच्या ताब्यात दिले होते. त्याबद्दल पीएमपीएलच्या विभागाअंतर्गत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. याशिवाय त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार २०१४ मध्ये उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारसह दहा वेळा विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या