एनसीबीच्या 'स्पेशल-२६' बोगस कारवाया!

मंत्री नवाब मलिक : वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा


मुंबई

क्रूझवरील ड्रग्ज छापा प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकल्यापासून राज्यात राजकीय आरोप आणि गौप्यस्फोटांची मालिका सुरू झाली. मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 'स्पेशल-२६' नावाने नवा गौप्यस्फोट केला. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी २६ बोगस कारवाया केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट करत हे पत्र प्रसिद्ध केले आहे. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

एनसीबीमध्ये काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे. ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा २६ केसचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे. एका गरजू मागासवर्गीत उमेदवाराचा नोकरीचा हक्क समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच यासंदर्भात जातवैधता समितीकडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांना सोमवारी सायंकाळी तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले. याचबरोबर एनसीबीचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह दोन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. वानखेडेंवरील आरोपांची चौकशी हे पथक करणार आहे. दिल्लीत पोचल्यानंतर वानखेडे यांनी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले नसल्याचा खुलासा केला होता. मला चौकशीसाठी समन्स बजावलेले नसून, वेगळ्याच कामासाठी बोलावले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यावरील आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, वानखेडेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पैशासाठी आरोप; भाजपचे स्टिंग ऑपरेशन

भाजप नेते मोहित कंबोज यांनी रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचं स्टिंग ऑपरेशन करून प्रभाकर साईल याने पैशासाठी खोटे आरोप केल्याचा दावा केला. साईल याने किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती आणि त्याने ते दिले नाहीत म्हणूनच प्रभाकर साईल आता आरोप करतोय, असे रामजी गुप्ता सांगत आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मियाँ नवाब आणि मनोज यांचा हात असल्याचेही यात स्पष्टपणे ऐकू येते.

...याचा अर्थ साक्षीदार फुटला?

एखाद्या तपास कामात तपास अधिकाऱ्याबद्दल काही आरोप झाले तर त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांना त्याचा तपास करण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे या अधिकाऱ्याविरोधात साक्षीदाराने आरोप केले असेल तर ते वरिष्ठ अधिकारी तपासतात. मात्र त्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई होईलच असे नाही. साक्षीदार उघडपणे आरोप करत असेल तर याचा अर्थ तो साक्षीदार फुटला आहे, असे देखील सकृद्दर्शनी म्हणावे लागेल. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची वरिष्ठांनी विचारपूस केली केली तर तपास सुरू झाला असे म्हणता येणार नाही.

- ऍड. उज्वल निकम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या