माजी मंत्री गणेश नाईक यांचा तालुक्यात औद्योगिक भेट दौरा.


प्रतिनिधी  निरगुडसर

राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी आज मंचर परिसरात असणाऱ्या विविध उद्योग समूहांना भेटी देत त्या उद्योग समूहांचे काम कसे चालते व त्यात काय काय निर्माण होते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या माजी शिक्षण सभापती रामशेठ विचारे, वसई विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील व भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या समवेत मंचरच्या दौऱ्यावर असणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईक यांनी सर्वप्रथम साडेतीन हजार गाईंचा गोठा असणाऱ्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म ला भेट दिली. डेअरी फार्मचे संचालक प्रीतमशेठ शहा यांनी भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म बाबत नाईक यांना सविस्तर माहिती दिली.

भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म नंतर गणेश नाईक यांनी मोरडे फूड्स या चॉकलेट निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला भेट दिली. मोरडे फूडसचे संचालक हर्षल मोरडे यांनी नाईक यांना चॉकलेट निर्मितीबाबत व निर्मिती प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती दिली.

त्यांनतर नाईक यांनी पराग डेअरी फूड्स कंपनीला भेट दिली. पराग डेअरीचे संचालक प्रीतम शेठ शहा यांनी त्यांना पराग डेअरी मधील चीज निर्मिती प्रकल्प दाखविला व त्याबाबत सविस्तर माहिती दिली.

माजी मंत्री गणेश नाईक यांनी शेवटी मंचर येथील साई सेन्ट्रंल मॉलला भेट दिली. साई फर्निचर्सचे संचालक अजय घुले यांनी साई फर्निचरच्या विक्री व विक्रीपश्चात सेवे बाबत नाईक यांना माहिती दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या