देवभूमीत जलतांडाव..!

रस्त्यांना नदीचे स्वरूप । २२ मृत्यू । चारधाम यात्रा स्थगित


डेहराडून

उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून नद्या वाहत असल्याचे चित्र आहे. तर नद्यांना मोठा पूर आला आहे. उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरखंड सरकारने दिली आहे. चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नदीला पूर आल्याने बांधकाम सुरू असलेला पूलही वाहून गेला आहे. दरम्यान, सरकारने चारधाम यात्राही स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचं सांगण्यात येतंय. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आलं. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते. पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला होता. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या पलिकडे अडकलेल्या अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या