ट्रक चालकाच्या प्रसंगावधानतेने अपघात टळला


लिंपणगाव प्रतिनिधी

लिंपणगाव ते रेल्वे स्थानक या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झालेली असून, दिवसेंदिवस या महत्वाच्या रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वीच ट्रक चालकाच्या चतुराईने रस्त्यावर मोठा अपघात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा रेल्वे स्थानकाकडून लिंपणगावकडे रासायनिक खताचा ट्रक रस्त्यातून जात असताना महावितरण कंपनीच्या उपकेंद्र नजीक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सदर ट्रक पलटी झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ट्रक चालकाच्या सावधगिरीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रक खड्ड्यात पलटी होत असतानाच अचानक ट्रक चालकाने ड्रायव्हरच्या दिशेने उडी मारल्यामुळे ट्रक चालक बालंबाल बचावले आहे.  त्यामुळे या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा नादुरुस्त रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी लक्ष देणार आहे की नाही? किंबहुना प्रवासी वाहनचालकांचा बळी गेल्यानंतर हा रस्ता दुरुस्त करणार आहेत की काय ?असा देखील प्रश्न माजी सैनिक खासेराव पवार व गावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान लिंपणगावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्थानक रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात लिंपणगाव ग्रामपंचायतीने देखील श्रीगोंद्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. परंतु  श्रीगोंद्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्वाच्या रस्त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. असे उपसरपंच कुरुमकर यांनी म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या