नवी दिल्ली
पेगासससाठी पंतप्रधानांनी आदेश दिले होते किंवा गृहमंत्र्यांनी? आपल्याच देशावर इतर देशाशी संगनमत करून पंतप्रधानांनी आपल्या देशावर हल्ला केला आहे. हे आम्हाला पंतप्रधानांकडून ऐकायचे आहे, त्यासाठी या प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी राहुल गांधींनी केला. सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेचे समर्थनच केले आहे. पेगाससला कोणी अधिकृत केले? त्याचा वापर कोणाच्या विरोधात झाला? इतर कोणत्या देशाला आपल्या नागरिकांची माहिती उपलब्ध होतेय का?, असे तीन प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पेगासस हेरगिरी प्रकरणावरून त्यांनी केंद्र सरकारला घेरले. या प्रकरणात सरकारच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
पेगाससचा उपयोग हा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजप मंत्री आणि इतरांविरोधात केला गेला. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पेगासस वापरून डेटा मिळवत होते का? निवडणूक आयोग, सीईसी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा डेटा पंतप्रधानांकडे जात असेल तर ते गुन्हेगारी कृत्य आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पेगासस हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी होणार आहे. हे मोठे पाऊल आहे. यातून सत्य बाहेर येईल, असा विश्वास राहुल गांधी व्यक्त केला. आम्ही हा मुद्दा पुन्हा संसदेत मांडू. संसदेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. यावर चर्चा करणे भाजपला पटणार नाही, असे ते म्हणाले.
0 Comments