२० पर्यत पोलीस कोठडी
प्रतिनिधी निरगुडसर
एकलहरे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी संजय शिवराम वायाळ ( रा.सुलतानपूर ता.आंबेगाव ) यांचा पूर्व वैमनस्यातुन खून केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी भरत जानकू वायाळ, व लक्ष्मण जानकू वायाळ या दोघांना अटक केली आहे. या आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता त्याना बुधवार दि. २० पर्यत पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे. तर फरार संशयित अमर लक्ष्मण वायाळ चा शोध मंचर पोलीस घेत आहेत.
मयत संजय वायाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालय एकलहरे येथे भरत जानकू वायाळ, अमर लक्ष्मण वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ यांच्या अवैध बांधकामाची नोंद होऊ नये म्हणून अर्ज दिला होता. यावरून भरत वायाळ आणि अमर वायाळ यांनी संजय यांना मारहाण केली होती. याबाबत मंचर पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल आहेत. संजय यांची पत्नी माधुरी वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय हे शनिवारी दि. १६ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मामाचा मुलगा मिलिंद शिंदे यांच्याकडे गेले होते. मात्र बारा वाजण्याच्या सुमारास संजय वायाळ हे सुलतानपूर रोड येथे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या बाजूला मोटरसायकल पडलेली होती. त्याच्यापुढे वायाळ यांची ओमिनी गाडी (एमएच १४ डीएन ६०९५) उभी होती. त्यात कोणीच नव्हते. तातडीने संजय यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आणले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करीत आहेत.
0 टिप्पण्या