सूर्यमालेच्या अभ्यासासाठी ‘लुसी’ तयार


नवी दिल्ली 

सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या आणखी एका मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुमारे 1500 किलो वजनाचे आणि 6 मीटर लांबीचे दोन सोलर पॅनल असलेले ‘लुसी’ हे यान ‘एटलास-5’ या प्रक्षेपकाने अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या तळावरुन यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले. हे यान पुढील 12 वर्ष प्रवास करत गुरु ग्रहाजवळ असलेल्या 8 विविध लघुग्रहांजवळून जात त्यांची छायाचित्रे काढणार आहे. यामधून या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे.

लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे गुरु ग्रहांच्या समकक्ष मागे आणि पुढे गुरु ग्रहाबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या लघुग्रहांना गुरु  ग्रहाचे ट्रोजन म्हणून ओळखलं जातं. हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत असा खगोल अभ्यासकांचा कयास आहे. त्या वेळी मोठ्या ग्रहाची निर्मिती झाली नाही, पण त्याचे अवशेष हे या लघुग्रहांच्या रुपाने बाकी  आहेत असा अंदाज आहे. तेव्हा या लघुग्रहांचा अभ्यास हे ‘लुसी’ यान करणार आहे. यामुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोठी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

या लघुग्रहांची संख्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे. एक किलोमीटर पासून ते 100 किलोमीटर पर्यंत व्यासाचे विविध आकाराचे हे लघुग्रह या जुपिटर ट्रोजन मध्ये आहेत. यापैकी 8 मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास ‘लुसी’ यान करणार आहे. या लघुग्रहाच्या पट्टयात पोहचण्याआधी एकदा सूर्याभोवती आणि एकदा पृथ्वीजवळून प्रदक्षिणा घालत लुसी यान मार्गस्थ होणार आहे. गुरु ग्रहाजवळील लघुग्रहांचा तेही एवढ्या संख्येने अभ्यास करणारी ही जगातील पहिलीच मोहिम असल्याचं नासाने म्हंटलं आहे.  

‘लुसी’ नाव का ?

आफ्रिकेतील इथोपिया देशामध्ये 1974 च्या सुमारास एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते. अभ्यासाअंती हे अवशेष तब्बल 32 लाख वर्षांपूर्वीचे असल्याचं स्पष्ट झालं. हा सांगाडा महिलेचा असल्याचंही नंतर लक्षात आलं. तेव्हाच्या एका प्रसिद्ध गाण्यातील एक शब्द वापरत ‘लुसी’ हे नाव या महिलेच्या सांगड्याला देण्यात आलं. या अवशेषांमुळे मानवशास्त्र अभ्यासाची दिशा बदलून गेली. तेव्हा हेच नाव नासाने या यानाला दिलं आहे. हे यान सूर्यमालेबद्दलच्या अभ्यासाची दिशा बदलवेल अशी अपेक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या