शाळेसोबत एसटीही झाली सुरु

टाकळी हाजी, म्हसे बुद्रुक ग्रामस्थांच्या मागणीची दखल 


कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या बेट भागातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी शिरूर आगाराची शिरूर - जळवंडी ही कोरोना काळात बंद ठेवण्यात आलेली बस सेवा रविवार दि. १७ ला शिरुर आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे व वाहतूक निरीक्षक गणेश रत्नपारखी यांनी तात्काळ सुरु केल्याने या बसचे चालक,वाहक व अधिकाऱ्यांचा म्हसे बुद्रुक,टाकळी हाजी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही बस सेवा तात्काळ सुरु करावी म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, मीना शाखा कालवा समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी शिरूर आगारास दि. १२ ला निवेदन दिले होते. त्यांच्या या पाठपुराव्यास शिरूर एस टी आगाराने सकारात्मक प्रतिसाद देत ५ दिवसातच ही बस सेवा सुरु केल्याने गावडे व वायसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर बस सुरु झाल्याने विद्यार्थ्यांची मोठीच सोय झाली आहे. 

शिरूर - जळवंडी ही बस सेवा सुरु झाल्याने म्हसे बुद्रुक,टाकळी हाजी,वडनेर,जांबुत,पिंपंरखेड इत्यादी गावातील विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा सुरु झालेली ही बस सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोविड काळात बंद ठेवण्यात आलेली ही बस सेवा पुन्हा सुरु झाल्याने परिसरातील विद्यार्थी,नागरिकांनी शिरूर आगाराचे आभार मानले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या