Breaking News

जवळे येथे अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

अत्याचारानंतर खून केल्याचा संशय..


पारनेर तालुका प्रतिनिधी 

पारनेर तालुक्यामधील जवळे गावातील बरशीले वस्तीवर १६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला आहे. बुधवार दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी साधारणत: २ च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

१६ वर्षीय १० वीमध्ये शिकणार्‍या मुलीचा तिच्या राहत्या घरामध्ये संशयास्पद मृतदेह आढळुन आल्यामुळे परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मुलीचे आईवडील मोलमजुरी करत असुन ते कामावर गेले होते. लहान भाऊसुध्दा दुपारी दिडचे दरम्यान बाहेर गेला होता. भाऊ घरी आल्यानंतर दृश्य पाहुन तो घाबरुन गेला व त्याने आरडा ओरड केल्यावर लोक जमा झाले. मुलीच्या मृतदेहाजवळ चाकू व कापडी बोळा आढळुन आल्यामुळे मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मुलीला खाजगी रुग्णालयामधे हलविण्यात आले  मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. अज्ञात नराधमाने घरी कुणी नाही या संधीचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करुन प्रकरण उघडकीस येण्याच्या भितीने तिला चाकुचा धाक दाखवत,तिच्या तोंडामधे कापडी बोळा कोंबुन तिला ठार केल्याचा परीस्थितीवरुन प्राथमिक अदाज व्यक्त केला जात आहे.

जोपर्यत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय असल्याचे समजते. शवविच्छेदनासाठी मृतदेह अहमदनगर येथे पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशन करत आहे. शवविच्छेदनानंतर सत्य परीस्थिती पुढे येईल.

आम्ही मुलांना ठेवायचे कुठे..?

गावातील मुली जर घरातच सुरक्षित नसतील तर आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला गेल्यावर आमच्या मुलांना ठेवायचे कुठे..? त्यांना कोण सांभाळणार ओ..? असा सवाल गहिवरून आलेल्या मुलींच्या वडीलांनी उपस्थितांपुढे केला. 


Post a Comment

0 Comments