दसऱ्या निमित्त बाजारपेठ फुलली..!


बारामती 

दसऱ्यानिमित्त  बारामतीतील बाजारपेठ  फूलली होती. पूजेचा मान असलेला गोंडा (झेंडू), आपटा, तोरणासाठीची आंबा-अशोकाची पाने, नागिणीची पाने आदी पाना फुलांच्या खरेदीसाठी बारामतीतील बाजारपेठेत (दि:१५) रोजी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसरा  विविध वस्तू, सोने, आभूषणे, वस्त्रखरेदी करण्यासाठी बारामती शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे तेथे उत्साह ओसंडून वाहत होता. विजयादशमी निमित्त कपडे, मिठाई, झेंडूची फुले, पूजासाहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानास व झेंडूच्या फुलांना महत्त्व आहे. त्याच्या खरेदीसाठी बारामतीतील भिगवन चौक, गांधी चौक, गुनवडी चौक, इंदापूर चौक , भाजी मंडई, जुनी मंडई परिसरात  झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती.

बारामतीतील  बाजारपेठ मध्ये  मोठ्या प्रमाणावर शेतकरी व व्यापारी यांनी झेंडू विक्रीसाठी  पहाटेच दाखल झाले होते. झेंडूच्या एका किलो साठी ७० ते ८०  रुपये असा दर दसऱ्यानिमित्त  पाहवयास मिळाला. या  तुलनेत झेंडूव्यतिरिक्त इतर फुलांना मागणी नव्हती. मात्र, झेंडूच भाव खाऊन गेल्याचे अनेक शेतकरी व  विक्रेत्यांनी सांगितले. मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच नगदी पीक म्हणून गणल्या गेलेल्या फूल शेतीचे मोठे नुकसान झाले. पाऊस व खराब हवामानामुळे फुलांचे मोठे नुकसान झाल्याचे फूल उत्पादक दादा कामठे यांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धेच उत्पादन आल्याचे त्यांनी सांगितले. आता उत्पादन घटल्याने बाजारात फुलांना तेजी असलीतरी वाढीव खर्चामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या