Breaking News

दिवाळीत निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई मिळावी यासाठी कडक कारवाईचे निर्देश


पुणे प्रतिनिधी

सणाच्या दिवसांमध्ये जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्नपदार्थ मिळावेत यासाठी कडक कारवाईचे निर्देश 'अन्न व औषध प्रशासन' (एफडीए) मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.डॉ. शिंगणे यांनी खात्याची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी 'एफडीए'चे आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.

जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी मिठाई आणि इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. स्वच्छता, अन्न परवाना आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींची माहिती त्यांना करून द्यावी. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि मुदत संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करावी. त्याचबरोबर दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सिंग म्हणाले, की राज्यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान दुधावर केलेल्या कारवाईत चार लाख ६० हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. तसेच, दुग्धजन्य पदार्थांच्या कारवाईत ३९ लाख ५० हजार ३८६ रुपयांचा माल जप्त केला आहे. सणाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या मोहिमेत खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तूप, रवा मैदा, बेसन मसाले अशा भेसळ युक्त पदार्थांचा ३१ लाख ११ हजार ५१४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

फार्मासिस्ट नसेल तर कारवाई करा

फार्मासिस्ट नसलेल्या औषध दुकानांचे परवाने रद्द करा, असे आदेश 'एफडीए'चे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. आयुर्वेद, ॲलोपॅथी व इतर औषध निर्मितीचा दर्जा सातत्याने तपासावा असेही त्यांनी सांगितले.


No comments