राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराकडून गटार लाईन करण्यास दिरंगाई

 बसस्थानकाची मोडतोड ;  दूषित पाण्यामुळे दुर्गंधी


लिंपणगाव  प्रतिनिधी 

काष्टी -लिंपणगाव -श्रीगोंदाकडे मार्गस्थ होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित ठेकेदाराकडून लिंपणगावच्या बस स्थानकावरील जुनी गटार लाईन रस्ता दुरुस्ती करताना उघड्यावर पडली आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या रहिवाशांचे सांडपाणी अक्षरशा बसस्थानकावर अनेक दिवसापासून साचले असल्यामुळे त्या पाण्याची दुर्गंधी होऊन डेंगू सारखा आजार फैलावू शकतो. यासंदर्भात ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित इन्फ्रा कंपनीचे ठेकेदारांना सूचना करूनही या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना आक्रमक बनले आहेत. दरम्यान काष्टी- लिंपणगाव -श्रीगोंदा मार्गे सुरू असलेले मुंबई-लातूर रस्त्याचे काम युध्द  पाळीवर सुरु असले तरी लिंपणगाव सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावातील बस स्थानकावर मात्र संबंधित ठेकेदाराने जुनी गटार लाईन खोदून उघड्यावर सोडली असल्यामुळे त्या परिसरात दूषित पाणी साचले असल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. 

गेली 10 महिने हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र फक्त रस्त्याचेच काम उरकते  घेऊन आता हे काम श्रीगोंदाच्या पुढे चालू असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. परंतु लिंपणगाव परिसरातून हे काम करत असताना साईड पट्ट्यांची बाजू खोदून गावच्या गटार लाईनची देखील प्राथमिक शाळेपासून ते थेट बसस्थानकाच्या परिसरापर्यंत जवळपास एक फर्लांग जुनी गटर लाईन नेस्तनाबूत केली आली आहे. त्या खड्ड्यांमध्ये रस्त्याच्या नजीक राहणाऱ्या ग्रामस्थांचे घरगुती वापराचे दूषित पाणी थेट बस स्थानकाच्या खड्ड्यात साचून तेथे त्या खड्ड्यांमध्ये आळ्यांचा प्रादुर्भाव जाणवू लागला असून, या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे डेंग्यूचे रुग्ण देखील वाढल्याची माहिती समोर येत आहे .अशा या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रवीण कुरुमकर यांनी म्हटले आहे.

उपसरपंच अरविंद कुरुमकर यांनी म्हटले की, संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्याकडेची साईड पट्टीत खोदताना बसस्थानक देखील नेस्तनाबूत करून आज प्रवाशांना निवारा उपलब्ध राहिलेला नाही. कुणाच्या सांगण्यावरून बस स्थानकाची मोडतोड केली. याचादेखील संबंधित ठेकेदारांनी खुलासा करावा या प्रलंबित कामाबरोबरच रस्त्याच्या कडेला बसस्थानकनजीक दोन खाजगी दवाखाने, मेडिकल, किराणा दुकाने, तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

 ग्रामपंचायत प्रशासनाने देखील संबंधित ठेकेदाराला पत्र व्यवहार केल्याचे सरपंच शुभांगी जंगले यांनी सांगितले. परंतु अद्याप पर्यंत बंदिस्त गटार लाईन संदर्भात हालचाल होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. प्रसंगी आम्हाला गावाच्या वतीने ग्रामस्थांसह वेगळा विचार करावा लागेल ,असा इशारा देखील सरपंच शुभांगी जंगले यांनी  दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या