मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई
महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातर्फे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, पोलीस अंमलदार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी राज्य शासनासाठी हा समाधानाचा क्षण आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे स्वतःचे असे स्वप्न असते, त्यांना भावना असतात. पोलीस हे राज्य शासनाचा कणा आहे. या सर्वांचा कणा ताठ ठेवणे, त्यांचा माणूस म्हणून विचार करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांना पुरेशा सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे पोलीस अंमलदार यांना अधिकारी पदापर्यंत कामाची संधी मिळणार आहे. यामुळे चौकशी अभावी प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणे तसेच प्रकरणे निकाली काढण्यास गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पोलीस अंमलदारांसाठी कॅशलेस उपचार तसेच खेळाडूंना पदोन्नती या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून गृह विभागाने यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
0 टिप्पण्या